अहमदनगरचा भुईकोट किल्ला
इतिहास
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली. मोगल बादशहा शाहजहानने इ.स. १६३६मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला, तर इ.स. १८०३ साली ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला.
अहमदनगरजवळचा हा भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी इ.स. १५५३ साली बांधण्यास सुरवात केली. चांदबिबीने जुलै इ.स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडून विकत घेतला. इ.स. १७९७ पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ.स. १८०३ ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला.
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी ’हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ शब्दबद्ध केला.
अहमदनगर शहरात राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ लिहिले.
इ.स. १९४७ ला किल्ला भारत सरकारच्या सैन्यदलाच्या ताब्यात देण्यात आला.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
गड सैन्यदलाच्या ताब्यात आहे.
गडावरील राहायची सोय
किल्ला सैन्य दलाच्या ताब्यात असल्याने, किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. राहन्यासाठी अहमदनगर शहरात सोय होऊ शकते.
जाण्यासाठी लागणारा वेळ
अहमदनगर शहराच्या आसपासचे किल्ले आणि संबंधित मराठ्यांची घराणी
मराठ्यांच्या प्रमुख घराण्यांपैकी विठोजी भोसले, मालोजी राजे भोसले, लखुजी जाधवराव निंबाळकर पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यांवर फंदफितुरी करून मिळवून दिल्याबद्दल साक्री आणि रुई ही गावे देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकरांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर (कर्नाटक) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत.
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि बाजी (तिसरे) हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. त्यांच्याकडे किल्ले राजगडची तट-सरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम जिंकल्यावर तेथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी योगदान दिले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुषांनी आपला देह ठेवला. आजही कदमांनी पारंपरिक आणि दुर्मीळ अशी जुनी शस्त्रे जपून ठेवली आहेत. ह्यात धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवा, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवाजीकालीन नाणी (शिवराया) आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत.
No comments:
Post a Comment