Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, June 13, 2021

राजमाची किल्ला

राजमाची किल्ला

राजमाची किल्ला हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. येथे जाण्यासाठी लोणावळ्याहून तुंगार्ली गावात जावे नंतर थोड्या चढणीनंतर तुंगार्ली धरणाच्या समोरुन ठाकर वस्तीवरून खाली उतरल्यावर सुमारे १८ किलोमीटर चालल्यावर राजमाचीच्या पायथ्याजवळ जाता येते. पायथ्याला उधेवाडी गांव असून गावातील घरांमध्ये रहाण्याची सोय होते. गडावर थोडीशी तटबंदी बुरुज व इमारतींचे जमीनदोस्त अवशेष दिसतात. किल्ल्याच्या वाटेवरुन जाताना एका बाजुला पावसाळ्यात उल्हास नदीच्या खोऱ्यात घनदाट झाडी प्रचंड धबधबे, उसळणारे ढग, अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती हे दृश्य अतिशय सुंदर, रमणीय आनंददायी आहे.

सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगमुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे खोरेम्हणून ओळखला जातो. याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. याच उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी. अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याण, नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून बोरघाटामार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग. जसा नाणेघाट तसा बोरघाट. त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख किल्ले राजमाची. किल्ल्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामुळे हा किल्ला म्हणजे लष्करीदृष्ट्या एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याचा दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.

इतिहास :

राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे. यालाच कोडांणे लेणीअसे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावापासून आग्नेयेस २ कि.मी. अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवाटीला खोदलेली आहेत. अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते, की हा किल्ला साधारण २५०० वर्षांपूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणाचा दरवाजासंबोधण्यात येत असे.

कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटवरील राजमाची, लोहगड, तुंग,तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाकल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीने वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होनी आंग्रे यांना हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६ मध्ये सदाशिवराव तोतयाने संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटापर्यंत पोहचला त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि बाजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.

पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळएका मोठ्या दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थानिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे. या परिसरात याला जिजाऊ कुंडम्हणतात. या कुंडात लोक मोठ्या श्रद्धेने सूर्यस्नान करतात.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

लोणवळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येतांना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योद्ध्याचे स्मारक, अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष, गणपती आणि मारुतिरायाची मूर्ती आहे. किल्लावरून आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे तिला उधेवाडीअसे म्हणतात.

§  उदयसागर तलाव : पावसाळ्यात हा किल्ला मात्र ओसंडून वाहतो. तलावाच्या समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळ्यात दरीतून पडणाऱ्या धबधब्याचे सुंदर दृष्य दिसते. हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोसळणारा पाऊस या आल्हाददायक वातावरणामुळे मनोमनी कुसुमाग्रजांच्या ओळी गुणगुणायला लागतात. 
पलिकडे खळाळे इर्मळ निळसर पाणी 
उतुंग तरुंची उभी सभोती श्रेणी 
एकाकी धूसर पाऊलवाट मधे ही 
तिजवरून विहारे मनामध्ये वनराणी.

§  मनरंजन : उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. मनरंजनवर जाणारी वाट सोपी आहे. या किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे. किल्ल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडीबांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो.

§  श्रीवर्धन : राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यापैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते. दरवाजाची कमान बऱ्यापैकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे. समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोट्याचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो.

§  शंकराचे मंदिर : तलावाच्या पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच गोमुख असून त्यातले पाणी समोरच्या टाक्यांमध्ये पडते. सध्या या मंदिराच्या उत्खननाचे काम गावकऱ्यांनी हाती घेतलेले आहे. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती कातळदराया नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला भैरव डोंगरम्हणतात. अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन. बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात. श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखलपट्टी आहे. यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :

§  लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे : लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात यावे. ही वाट १९ कि.मी. ची आहे. वाटेने किल्लावर जाण्यास पाच तास लागतात.

§  कर्जतहून कोंदीवडे मार्गे : कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने यावे. इथून गडावर जाण्यास सुमारे ३ ते ४ तास लागतात.

उधेवाडी गावात राहण्याची सोय उत्तम होते. भैरवनाथाच्या मंदिरातही आणि बालेकिल्ल्यावर जातांना लागणाया गुहेतही राहाता येते. राजमाची रुलर एड एन्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेने बांधलेल्या खोल्यांमध्येही रहाण्याची व्यवस्था होते. राजमाची गावात जेवणाची उत्तम सोय होते. राजमाची गावात पाण्याची सोय होते. गडावर जाण्यासाठी तुंगार्ली मार्गे ५ तास, कर्जत-कोदिंवडे मार्गे २ तास लागतात.

 

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages