Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, June 13, 2021

अजिंक्यतारा

अजिंक्यतारा

अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे.

प्रतापगडापासून फुटणार्‍या बामणोली रांगेवर अजिंक्‍यतारा उभारलेला आहे. अजिंक्‍यतार्‍याची उंची साधारणत: ३०० मीटर असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटर आहे. आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.

कसे जाल ?

अजिंक्‍यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारा एस.टी. स्थानकावरून अदालत वाड्यामार्गे जाणार्‍या कोणत्याही गाडीने अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जाता येते. सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर १०-१५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडाबस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत चालत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने असलेल्ली वाट गडावर जाणार्‍या गाडी रस्त्याला लागते. व त्या रस्त्याने १ कि.मी. चालत गेल्यावर माणूस गडाच्या दरवाज्यापाशी पोहचतो. अजिंक्‍यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्तासुद्धा आहे. गोडोली नाका परिसरातून देखील गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. आपण या रस्त्यावरूनसुद्धा थेट गडावर जाऊ शकतो. कोणत्याही मार्गाने गड गाठण्यास साधारण १ तास लागतो. गडावर पहाटे चढून जाणे प्रकृती च्या दृष्टी ने चांगले आहे.

सातारचा किल्ला (अजिंक्‍यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्‍यतारा. सातार्‍याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसर्‍या भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्‍नी चांदबिबी येथे कैदेत होती. शिवाजीच्या राज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने सातार्‍याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मुघलांनी सुरुंगलावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणार्‍या मोगलांवर ढासळला व दीड हजार मुघल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण आझमतारा झाले .ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर अजिंक्‍यतारा केले., पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छ.शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली. दुसर्‍या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

सातार्‍यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. मात्र गडावर पाण्याची सोय नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसारभारती केंद्राचे दोन टॉवर आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व 'मंगळादेवी मंदिराकडे' असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे.मंदिराकडे जाताना तीन तळी वाटेत लागतात. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्पे आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या उत्तरेलादेखील दोन दरवाजे आहेत. ते तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात एकातही पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्लेकल्याणगडजरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो.तसेच दक्षिण दिशेला निनाम(पाङळी) हे गाव आहे. या गावात एक पुरातन (इ.स. १७००) मधील कोल्हापूरच्या (रत्‍नागिरीवाङी) जोतिबाचे देऊळ आहे. तसेच गावालगत ङोंगर आहे. तेथे पांडवगळ नावाचे एक पुराणकालीन प्रेक्षणीय स्थळ आहे व या गावाच्या पशिम दिशेला तलाव आहे.

संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणतः दीड तास लागतो. गडावरून मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहराचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. जर आपण निसर्गप्रेमी असाल तर वर्षा ऋतूच्या सुरुवातीनंतर आपण या ठिकाणी येऊन अजिंक्यतारा किल्ल्याची सुंदरता बघू शकता.

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages