Topics

Post Top Ad

Sunday, June 13, 2021

कोराईगड किल्ला

कोराईगड किल्ला

कोरीगड - कोराईगड किल्ला - कोरीगड- कोराईगड किल्ला Korigad - Koraigad Fort – ३००० फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

लोणावळ्याच्या दक्षिणेला सहज जाता येण्यासारखा हा किल्ला. घाटमाथ्यावर असल्यामुळे एकाच वेळी कोकण व देशावरील परिसराने विस्तृत दर्शन घडते. तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यावर कोराईदेवीचे मंदिर व मोठे तळे पहाण्यासारखे आहे. बुरुजावरुन कोकणातील मुलुखाचे विहंगम दृश्य दिसते. मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचे नाव आहे कोरबारस मावळ. याच मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्याकडे असणाऱ्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्यःस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे या भागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड या सारखा सुंदर ट्रेकही या भागात आपल्याला करता येतो.

इतिहास :

या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही. १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग-तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला. गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली. या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही ही इंग्रजांना मिळाला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

पेठ-शहापूर गावातून कोराईगड एका भिंतीसारखा भासतो. गडमाथा म्हणजे एक भलेमोठे पठारच आहे. गडाची तटबंदी साधारणतः दीड किलोमीटर लांबीची आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरा घालता येतो. पेठ-शहापूरच्या वाटेने वर येताना मार्गात अनेक गुहा व पाण्याची टाके आणि श्री गणेशाची मूर्ती लागते. गणेशदरवाज्याने अर्थात पेठ शहापूरच्या वाटेने वर आल्यावर समोरच वाड्यांचे अवशेष आढळतात. समोरच पठारावर दुरवर कोराईदेवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. कोराईदेवीच्या मूर्तीची उंची साधारणतः चार फूट आहे. गडावर दक्षिणेकडच्या बाजूस अनेक बुरूज आहेत. गडावर आजही सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी लक्ष्मीतोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे. याचप्रमाणे गडावर आणखी दोनमंदिरे आहेत. गडावर दोन विस्तीर्ण तळी आहेत. तळ्यांच्या पुढे आणखी दोन गुहा आहेत. येथेच शंख-चक्र-गदा-पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे. गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा आणि माणिकगड असा सर्व परिसर दिसतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
सद्यःस्थितीला गडावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत.

§  पेठ-शहापूर : कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आय. एन. एस. शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी किंवा सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि भुशी धरणाच्या पुढे, आय.एन.एस. शिवाजीच्या पुढे २२ कि.मी वरील पेठ-शहापूर गावात उतरावे. या गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला पायऱ्यांशी घेऊन जाते. पायऱ्यांच्या साहाय्याने वीस मिनिटांत गडावर पोहचता येते.

§  आंबवणे गाव : कोरीगडला जाण्यासाठी आंबवणे गावातूनही जाता येते. ही वाट मात्र जरा अवघड आहे. या वाटेने जाण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेकडे अथवा थेट आंबवणेकडे जाणारी बस पकडावी. गावातून अर्ध्या तासात गडावर जाता येते.

गडावरील मंदिरात राहण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वतःच करावी. गडावर पाण्याची सोय नाही, गडावर दोन तळी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पेठशहापूर मार्गे गडावर येणाऱ्या वाटेवर दरवाजाच्या अलीकडे एक टाके आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे वापरावे. गडावर ज।ण्यासाठी पेठशहापूर मार्गे अर्धा तास लागतो.

 

 

Most View

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages