प्रतापगड
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजीच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.
ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे.किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात.आणि या प्रत्येक पर्वतांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजीचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत..
अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते.
कसे जावे?
प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.
उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते.
अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. हा(?) बुरूज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो.
No comments:
Post a Comment